शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केल्यामुळे आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. वीज कनेक्शन मुद्द्यावर लक्षवेधी सुरू असताना भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. या मुद्द्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सर्वच भाजपा आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला. भास्कर जाधवांनी माफी मागावी, अशी मागणीच देवेंद्र फडणवीसांनी केली. अखेल भास्कर जाधवांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. पण त्यावरून आता राजकीय नाट्य सुरू झालं आहे. भाजपानं यावरून भास्कर जाधव यांना खोचक सल्ला दिला आहे.
काय झालं विधानसभेत?
आज सकाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर वीजेच्या मुद्द्यावरील लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरू होती. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ लाख रुपये प्रत्येक भारतीयाच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं, असा उल्लेख केला. मात्र, पंतप्रधानांनी असा कोणताही उल्लेख केला नसल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांसह सर्वच विरोधी आमदारांनी आक्षेप घेतला. त्यावर भास्कर जाधव यांनी उठून मोदींची नक्कल करत त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली.
भास्कर जाधव यांनी केली नक्कल!
“२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं ते बोलले आहेत”, असं भास्कर जाधव नक्कल करत म्हणाले.
यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. भाजपा आमदारांनी भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केली. सभागृहात झालेल्या गोंधळानंतर कामकाज काही वेळ तहकूब करण्यात आलं. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली.
भातखळकरांचा भास्करांना सल्ला!
दरम्यान, हा प्रकार शांत झाल्यानंतर आता भाजपाकडून भास्कर जाधव यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर भास्कर जाधवांना खोचक सल्ला दिला आहे. “भास्कर जाधव स्टँडअप कॉमेडी का सुरू करत नाहीत? विधानसभेत नौटंकी करण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे”, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
नेटिझन्सनी शेअर केला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ!
अतुल भातखळकर यांच्या ट्वीटवर नेटिझन्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभेत बोलतानाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींनी डोळा मारल्याची नक्कल करून दाखवताना दिसत आहेत. तसेच, त्याची खिल्ली देखील उडवताना दिसत आहेत.
भास्कर जाधव यांची नक्कल आणि त्यानंतरचा माफीनामा यावरून दिवसभर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा पाहायला मिळाली.