नगर जिल्ह्य़ातील धरणांमधून मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तीन आमदारांनी मंगळवारी नागपूर येथे विधिमंडळाच्या पाय-यांवरच लाक्षणिक उपोषण केले. स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले व बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यात समावेश होता.
या उपोषणाची माहिती मिळताच जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या तिन्ही आमदारांची भेट घेऊन नगर जिल्ह्य़ावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
या वेळी कोल्हे म्हणाल्या, मराठवाडय़ाच्या पिण्याच्या पाण्यास आमचा विरोध नाही. मात्र त्यासाठी जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असताना नगर जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी घेण्याचा अट्टहास सुरू आहे. ऊर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे आहे. पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविणे गरजेचे आहे. गोदावरी कालव्यांना खरिपातही पाणी मिळाले नाही आणि रब्बी हंगामात आवर्तन सोडण्याबाबतही अनिश्चितता आहे. तरीही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सापत्न वागणुकीमुळे आम्ही आणखीनच हवालदिल झालो आहोत.
राज्य सरकारने या सगळ्याचा गांभीर्याने विचार करावा, इंडिया बुल्स आणि नाशिकचे कुंभमेळ्याचे पाण्याचे आरक्षण रद्द करावे, समन्यायी पाणीवाटप कायदा रद्द करावा, ऊर्ध्व गोदावरी खो-यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, बारमाही ब्लॉकधारकांना शाश्वत पाणीपुरवठा करावा, मूकणे धरण उंची वाढवावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Story img Loader