महाविकास आघाडी सरकार हा महाराष्ट्रातला न भुतो न भविष्यती असा प्रयोग होता. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष कधी एकत्र येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. हा प्रयोग जसा अनपेक्षित होता तेवढंच किंवा कांकणभर जास्तच महाराष्ट्रात घडलेलं सत्तांतर होतं. शिवसेनेत बंड होईल इतका मोठा गट फुटून भाजपासोबत जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना भाजपवर टीकेची एकही संधी सोडली नव्हती. तसंच मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही ते सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. भाजपने याला टोमणे बॉम्ब असं नाव दिलं आहे. हाच संदर्भ घेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपा महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे. यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

भाजपा महाराष्ट्राने पोस्ट केलेलं व्यंगचित्र नेमकं काय आहे?
भाजपा महाराष्ट्राने एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. या व्यंगचित्रात शरद पवार यांना ज्योतिषी दाखवण्यात आलं आहे.त्यांच्या नावाची पाटी बारामतीकर ज्योतिष अशी दाखवण्यात आली आहे. २०२३ चं भविष्य सांगायला ते झाडाखाली बसले आहेत. शरद पवारांना व्यंगचित्रात ज्योतिषी दाखवण्यात आलं असून संजय राऊत यांना पोपटाच्या रूपात दाखवण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरे त्यांच्याकडे हात दाखवत विचारत आहेत की या वर्षात माझे टोमणे बॉम्ब चालतील का?

आत्तापर्यंत अनेकदा उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी आधी विरोधी पक्षनेते असताना आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंच्या टीकेला टोमणे बॉम्ब असं नाव दिलं आहे. दसरा मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाविषयीही अशीच प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे. अशात आता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोस्ट करण्यात आलेलं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतं आहे.

२०१९ मध्ये काय घडलं?

२०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेना यांनी महायुती म्हणून लढवली होती. या निवडणूक निकालात भाजपाचे १०५ तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबद्दल या दोन्ही पक्षांचा वाद झाला तो विकोपाला गेला आणि युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि ते सरकार अडीच वर्षे चाललं. भाजपाने जून महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर ऑपरेशन लोटस राबवत महाविकास आघाडीला सुरुंग लावला. त्यानंतर ३० जूनला भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

शिवसेना दुभंगल्यावर पडले दोन गट

महाराष्ट्रात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर हा पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. एक आहे शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि दुसरा आहे ठाकरे गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. या दोन्ही गटांमधून सध्या विस्तव जात नाही. एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेले भाषणही हेच दाखवून देणारं ठरलं. आता भाजपाने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यंगचित्र पोस्ट करून संजय राऊत, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. याला ठाकरे गटाकडून किंवा शरद पवारांकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader