गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते मोहीत कंबोज हे चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडीतील नेतेमंडळींवर मोहीत कंबोत सात्याने टीका करत असताना आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दिशेने वळवला आहे. मोहीत कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांना लक्ष्य करत रविवारी सकाळी तीन ट्वीट केले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांनी रोहित पवार यांचं नाव घेतलं असून राष्ट्रवादीच्या इतर दोन अटकेत असलेल्या नेत्यांवरूनदेखील खोचक टोला लगावला आहे.

“सगळी चूक भाजपाची आहे!”

आपल्या ट्वीटमध्ये मोहीत कंबोज यांनी घोटाळ्यांमध्ये सगळी चूक भाजपाचीच आहे, अशा शब्दांत खोचक टोला लगावला आहे. “२००६ मध्ये भाजपानेच रोहीत पवार यांना पीएमसी बँक आणि एचडीआयएल घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचे पार्टनर बनायला भाग पाडलं”, असं देखील मोहीत कंबोज ट्वीटमध्ये खोचकपणे म्हणाले आहेत.

“घोटाळे समोर आले तर भाजपाला दोष देतायत”

घोटाळे समोर आल्यानंतर भाजपाला दोष दिला जातोय, असं कंबोज ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. “स्वत: सगळे घोटाळे करून आता ते समोर आल्यावर भाजपाला दोष देण्याचा हा एक नवीन धंदा आहे. जर तुम्ही काही चुकीचं केलंच नाहीये, तर मग घाबरण्याचं काय कारण? खरा माणूस कधीच कोणत्या चौकशीला घाबरत नाही. ज्याच्या मनात चोर आहे, तोच घाबरतो. ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारत नाही”, असं मोहीत कंबोज भारतीय यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

राष्ट्रवादी..बोलबच्चन आणि सलीम-जावेद!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बोलबच्चन आहेत, अशा आशयाचा टोला कंबोज यांनी लगावला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक बोलबच्चन होते..मियाँ नवाब मलिक (सलीम) आणि शिवसेनेत संजय राऊत (जावेद)! आता वाटतंय की या दोघांच्या जागांसाठी त्यांच्या पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. चालू द्या, पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका”, असं देखील कंबोज या ट्वीटमध्य म्हणाले आहेत.

मोहीत कंबोज यांच्या या ट्वीटमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्याने कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

Story img Loader