सांगली : दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने जतसाठी पाणी मिळावे, म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी संपूर्ण निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी भाजपा व मित्रपक्षांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे विजापूर-गुहागर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
जतमध्ये यंदा पाउस लांबल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आताच भासत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करावे, पूर्व भागातील ४१ गावांसाठी विस्तारित योजना मंजूर करण्यात आली असली तरी या कामाची अपुरी निविदा काढण्यात आली आहे, ती पूर्ण योजनेसाठी काढण्यात यावी, जतचा समावेश अमृत योजनेत करावा आदी मागण्यांसाठी गुहागर विजापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा – सांगली : बस शेडमध्ये घुसल्याने चालक आणि वाहकासह १६ जखमी
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले. या आंदोलनामध्ये जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, आकाराम मासाळ, रामन्ना जीवनणावर, बसगोंड, जबगोंड, लक्ष्मण बोराडे, अविनाश वाघमारे, मकसूद नगारजी, संतोष कोळी आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपा, रिपाइं या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन सुरू करण्यात आले. महाराणा प्रताप चौकामध्ये महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या मारला होता. यामुळे विजापूर, सांगोला, सातारा, अथणी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.