मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवर टीका करताना भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी ‘बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही.’ असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावर शिंदे गटासह महायुतीतला मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीनेही पलटवार केला. प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडूंनी अनिल बोंडेंसारख्या माणसाने किमान आपली लायकी पाहून तरी बोललं पाहिजे, असं म्हटलं. आता याबाबत विचारलं असता अनिल बोंडेंनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे एका दिवसापूर्वी लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या जाहिरातीवरून टीका करणाऱ्या भाजपा खासदार अनिल बोंडेंचा आज (१५ जून) सूर बदलला. लायकी पाहून बोलावं अशी टीका करणाऱ्या शिंदे गट समर्थक बच्चू कडूंनी केलेल्या टीकेवर अनिल बोंडे यांनी बोलणे टाळले.
“भाजपा-शिवसेनेत सलोख्याचं, समन्वयाचं वातावरण निर्माण करण्याला सुरुवात”
अनिल बोंडे म्हणाले, “आमदार बच्चू कडू काय बोलले हे मी ऐकलं नाही, परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे याची दखल घेतील. भाजपा-शिवसेनेमध्ये (शिंदे गट) सलोख्याचं, समन्वयाचं वातावरण निर्माण करण्याला सुरुवात झाली आहे.”
“आता केवळ एकच ध्येय आहे, ते म्हणजे…”
“आता केवळ एकच ध्येय आहे, ते म्हणजे २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा भारताचे पंतप्रधान बनवणे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अमृत काळाचं नेतृत्व करून भारताला एक नंबरचं राष्ट्र बनवण्याचा संकल्प आम्ही करतो आहे,” असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं.
“देशात मोदी, मग राज्यात कोण?”
“देशात मोदी, मग राज्यात कोण?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, खासदार अनिल बोंडे म्हणाले, “सध्या आमच्या डोळ्यासमोर तातडीने लोकसभा निवडणूक आहे. त्यासाठी सर्व काम सुरू आहे. आता नऊ वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी लोकांपर्यंत पोहोचवत आहे.”
“मोदींचं काम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपाकडून विशेष महासंपर्क अभियान”
“यासाठी भाजपाने विशेष महासंपर्क अभियान राबवलं आहे. यात जाहीर सभा होत आहेत. पत्रकार परिषदा होत आहेत. विधानसभा स्तरावर व्यापारी संमेलन, नागरिकांचं संमेलन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं संमेलन, मीटिंग विथ टिफीन या सर्व गोष्टी होत आहेत. या अमृत काळात भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व मिळावं, सक्षम नेतृत्वाच्या मदतीने भारत पुढे जाऊ शकतो हा विश्वास सर्वांना आहे. त्यामुळे सर्वजण एकदिलाने एकजुटीने प्रत्येकाच्या घरात जाणार आहोत. तसेच पत्रकं वाटून लोकांशी चर्चा करणार आहोत,” असंही अनिल बोंडेंनी नमूद केलं.