भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी अंतरवली सराटीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे खासदार संदीपान भुमेरही होते. अंतरवलीतल्या सरपंचांच्या घरी ही भेट झाली. यावेळी अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी जून महिन्यात उपोषणही सुरु केलं होतं. मात्र त्यावेळी शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. आता मनोज जरांगेंनी सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
मनोज जरांगेंनी काय म्हटलं आहे?
अशोक चव्हाण हे सरकार, समाज किंवा माध्यम म्हणून आले आहेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु राहिल. बाकी आमच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा सुरुच ठेवणार आहोत. सगेसोयऱ्यांच्या आमच्या व्याख्येप्रमाणे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेण्यात यावा. तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी चर्चा झाली आहे असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा- मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या! काय आहे प्रकरण ?
अशोक चव्हाण यांनी या भेटीनंतर काय म्हटलं?
आमचा सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आजपासून शांतता रॅली सुरु करणार आहेत. त्याआधीच सरकारच्या हालचाली दिसून आल्या. त्यामुळेच अशोक चव्हाण हे मनोज जरांगेच्या भेटीला आले. सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे समितीचा हा चार दिवसांचा हैदराबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहे. या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे. १३ जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही आम्ही आता उपोषण वगैरे करणार नाही तर विधानसभा निवडणुकीत नावं घेऊन उमेदवार पाडू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. आता अशोक चव्हाणांची शिष्टाई यशस्वी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या या भेटीची चर्चा रंगली आहे.