नांदेड : मागील पाच वर्षांत नांदेड ते बीदर ह्या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा मोठा गाजावाजा करणारे माजी राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासह प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपाचे खासदार यंदा आपापल्या मतदारसंघात पराभूत झाले. बीदर व नांदेड या दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीदर आणि नांदेड या एकमेकांस लागून असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. या मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार खुबा आणि चिखलीकर यांनी निवडणूक प्रचारात नव्या रेल्वेमार्गाचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. काँग्रेसचे डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या राजवटीत नांदेड ते बीदर या नव्या रेल्वेमार्गाची मागणी सर्वप्रथम झाली होती. २०१४ साली भगवंत खुबा हे बीदरमधून लोकसभेवर गेल्यानंतर त्यांनी याच मागणीकडे मोदी सरकारचे लक्ष वेधले; पण या नव्या रेल्वेमार्गासंबंधी काही घडामोडींची नोंद मागील पाच वर्षांत झाल्यानंतर चिखलीकर यांनी खासदार या नात्याने त्यांनी केलेल्या कामांची माहिती देताना, नांदेड-बीदर रेल्वेमार्गाचा मोठा गाजावाजा केला.

हेही वाचा >>> वाळव्यात जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम

शीख धर्मीयांसाठी नांदेड व बीदर या दोन्ही स्थानांना महत्त्व असल्यामुळे खुबा व चिखलीकर यांनी वरील रेल्वेमार्गाला प्राधान्य दिले होते; पण बीदर व नांदेडच्या मतदारांनी या दोन्ही खासदारांना पराभवाचा धक्का दिला. निवडणूक काळात खुबा यांनी जिल्ह्यातील देगलूरच्या सभेत वरील रेल्वेमार्गाचे श्रेय चिखलीकर यांना दिले; पण त्याचा मतदारांवर प्रभाव पडला नाही. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या राजवटीत भगवंत खुबा यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बीदरमध्ये काँग्रेसच्या सागर ईश्वर खांडरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तर इकडे नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही चिखलीकर यांना काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी पराभूत केले. वरील रेल्वेमार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी आपल्या हद्दीतील जमीन तसेच प्रकल्प खर्चातील ५० टक्के वाटा द्यावा, असे रेल्वे मंत्रालयाने दोन्ही राज्यांना मागील काळातच कळविले होते. त्यानुसार महाराष्ट्राने आपल्या वाट्याचा निधी देण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अधिवेशनात केली होती. पण कर्नाटक सरकारने अद्याप निधीसंदर्भात कोणतीही घोषणा केली नसल्यामुळे प्रस्तावित मार्ग अद्याप कागदोपत्रीच आहे.

नांदेड बिदर मार्गासाठी पाठपुरावा

नांदेडचे नवनिर्वाचित खासदार गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीला गेले होते. या दौर्यात त्यांनी पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. पहिल्या भेटीतच त्यांनी नांदेड-बीदर रेल्वे मार्गासंबंधी कर्नाटक राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या बाबीकडे खरगे यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी चव्हाण यांना आश्वस्त केल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp bhagwanth khuba and pratap patil chikhalikar defeated in their respective constituencies zws
Show comments