मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले आहे. बृजभूषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर राज ठाकरेंना आपला दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता राज ठाकरे यांचे पुतणे आणि शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्रृजभूषण सिंह यांनी त्यांच्या भेटीचे स्वागत केले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 “आम्हाला माहिती आहे की आदित्य ठाकरे अयोध्येत येणार आहे. त्यांना कोणीही विरोध करणार नाही. त्यांना कोणत्याही मंदिरात जायचे असल्यास कोणीही विरोध करणार नाही. विरोध फक्त एकाच व्यक्तीला आहे ज्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. राज ठाकरे यांच्या कुटूंबातील त्यांची आई, पत्नी, मुलगा आल्यास त्यांनी मी माझ्या घरी त्यांना आमंत्रित करेन. पण राज ठाकरे माफी मागत नाहीत तो पर्यंत त्यांना इथे येऊ देणार नाही,” असे बृजभूषण सिंह यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेचा टोला; म्हणाले “ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे…”

संजय राऊत बृजभूषण सिंह यांची भेट

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची अयोध्येत भेट होणार आहे. आज संध्याकाळी शरयू नदीच्या किनारी संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह आणि संजय राऊत यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत. सोमवारी ठाण्याहून काही शिवसैनिक अयोध्याला रेल्वेने रवाना झाले. आदित्य ठाकरे १५ जून रोजी सकाळी ११ वाजता लखनऊ विमानतळावर उतरतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते अयोध्येमध्ये जातील. तिथे दुपारी ३.३० वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp brijbhushan singh welcomes aaditya thackeray visit to ayodhya abn