उत्तर प्रदेशातील पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या राज्यातील अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. या परिस्थितीवरुन कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. भाजपाला घरचा आहेर देतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे.
Farmer suicide : कायमस्वरुपी तोडगा काढण्यात सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती – रोहित पवार
‘हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं’, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
काय म्हणाले होते बृजभूषण सिंह?
“उत्तर प्रदेशातील पूरग्रस्त नागरिक देवाच्या भरवशावर बसले आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्याबाबतचं एवढं ढिसाळ नियोजन मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. पण लोकप्रतिनिधींचं तोंड बंद आहे. तोंड उघडलं तर त्यांना बंडखोर म्हटलं जाईल”, अशा शब्दांत बृजभूषण सिंह यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
“यापूर्वी राज्यात कुणाचंही सरकार असो, पूर येण्याआधी तयारीबाबत बैठका घेतल्या जायच्या. अलीकडे अशी कोणतीही बैठक घेतली असेल, असं मला वाटत नाही. पुराचं पाणी कधी आटेल आणि आमच्या अडचणी कधी कमी होतील, याची प्रतीक्षा लोक करत आहे” अशी सडकून टीका सिंह यांनी भाजपावर केली आहे.
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं नुकसान
दरम्यान, महाराष्ट्रातही परतीच्या पावसानं धुमाकुळ घातला आहे. या पावसाचा फटका पिकांना बसला आहे. पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला, द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.