सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सांगितलं. तसंच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचा उल्लेख करत मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला. संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत बोलताना समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

मोठी बातमी! मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

“बहुजन समाजाला आरक्षण मिळावं अशी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. गरीब मराठ्यांसाठीच माझा हा लढा होता. बहुजन समाजात समावेश करुन घेतलं तर जातीय मतभेद ते कमी होतील, विषमता कमी होईल असा माझा प्रयत्न होता. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून तो मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.

“आधीच्या सरकारनेही जोमाने बाजू मांडून हायकोर्टाच्या माध्यमातून पारित झालं होतं. या सरकारनेही जोमाने बाजू मांडली. केंद्र सरकारलाही यामध्ये आणलं होतं. जे शक्य होईल ते सर्व दोन्ही सरकारने केलं होतं. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आपण जास्त काही बोलू शकत नाही,” असं संभाजीराजेंनी म्हटलं. कोणी कमी पडलं असं मी म्हणणार नाही. सर्वांनी आपली बाजू चांगली मांडली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“उद्रेक होऊ नये या मताचा मी आहे. करोनाची महामारी सुरु असताना, माणसं मरत आहेत. सध्या आपली माणसं जगली पाहिजेत याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणी उद्रेक शब्दही काढू नका,” अशी विनंती संभाजीराजेंनी मराठा समाजाला केली आहे. “बाकीच्या राज्यातील लोकांना ५० टक्के आरक्षण देत असताना महाराष्ट्राला वेगळा निर्णय का याचं वाईट वाटतं,” अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली.

Story img Loader