सध्या राज्यभर चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या मोठ्या फुटीची! अजित पवार, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकांची सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर सध्या देशाचे माजी रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सुरेश प्रभू यांनी गेल्या आठवड्यात एक फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. त्या फोटोला लाखो लोकांनी आत्तापर्यंत लाईक केलं असून त्यासंदर्भात खुद्द सुरेश प्रभूंनीच मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सविस्तर पोस्ट केली आहे.
काय आहे या फोटोमध्ये?
सुरेश प्रभू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे हा फोटो त्यांच्या कोकणातील घराच्या व्हरांड्यातला आहे. कोकणात सुरेश प्रभूंच्या वाडवडिलांचं जुनं घर आहे. गेल्या ३ शतकांहून अधिक काळ त्यांचे पूर्वज तिथे राहिले असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. याच घरी गेले असता त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांचा हा फोटो काढल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. या फोटोमध्ये सुरेश प्रभू एका आरामखुर्चीवर बसले असून त्यांनी निळी लुंगी परिधान केली आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा टीशर्ट, गळ्यात दोरी बांधलेला चष्मा अशा वेशात ते घराबाहेर बसले असून त्यांच्या पायांवर लॅपटॉप दिसत आहे. त्यांच्या डाव्या हातात एक मगही दिसत आहे.
नेटिझन्सकडून सुरेश प्रभूंचं कौतुक!
दरम्यान, नेटिझन्सकडून या फोटोवर मोठ्या प्रमाणावर कमेंट्स केल्या जात आहेत. काही रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभूंनी घेतलेल्या निर्णयांचे दाखले देत आहेत, तर काहींनी सुरेश प्रभूंना आजपर्यंतचे सर्वात यशस्वी रेल्वेमंत्री असल्याची पोस्ट केली आहे. फेसबुकवर या फोटोला आत्तापर्यंत ८८ हजाराहून जास्त लाईक्स आले आहेत. ट्विटरवर या पोस्टला १६ हजाराहून जास्त लाईक्स आणि ८३७ रीट्वीट्स मिळाले आहेत.
सुरेश प्रभूंची आभार मानणारी पोस्ट!
दरम्यान, मंगळवारी या पोस्टवर सुरेश प्रभूंनी आभार मानणारी एक पोस्ट केली आहे. “माध्यम तज्ज्ञांनी मला सागितलं की माझी पोस्ट आत्तापर्यंत सर्व सोशल मीडियावर जवळपास ८५ लाख लोकांनी पाहिली आहे. मी माझ्या गावी कोकणात गेलो असताना तिथल्या घरी हा फोटो काढण्यात आला आहे. ज्यांनी ही पोस्ट पाहिली आणि त्यावर मला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या, त्यांचे मी आभार मानतो”, असं सुरेश प्रभूंनी आपल्या नव्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.