भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडमधील गोपीनाथ गडावर आले असताना आजचा दिवशी राजकीय चर्चा न करता चांगली सुरुवात करण्याची इच्छा असल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच आपल्यावरील राजकीय आरोपांवर उत्तर देताना माझा जिल्हा जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा मी जिल्ह्यात नेहमीच असते. ते सिद्ध करण्याचा हा दिवस नाही, असंही नमूद केलं. गोपीनाथ गडावर दर्शनानंतर त्या दसऱ्याच्या निमित्ताने आज (१५ ऑक्टोबर) भगवानगडाकडे रवाना झाल्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “बाबांचा आशिर्वाद घेऊन भगवान बाबांचे आशिर्वाद घेण्यासाठी गोपीनाथ गड ते सावरगाव घाट हा प्रवास मी दरवर्षीप्रमाणे करणार आहे. मागच्या वर्षी करोनाच्या कारणामुळे हा प्रवास होऊ शकला नाही. छोट्याशा ब्रेकनंतर ती सुरुवात पुन्हा करतोय. लोकांच्या मनात उत्साह आहे. या दिवशी आपली ऊर्जा घ्यायची पुढचं वर्षभराचा आपला प्रवास करायचा या भावनेने लोक आमच्यासोबत जोडले जातील. सावरगावमध्ये देखील भगवान बाबांच्या दर्शनासाठी येतील.”

“तसे आमचे कार्यकर्ते समजूतदार, कुठल्याही दिखाव्याकडे कधीच कल नसतो”

“स्वागतासाठी कोणतीही मोठी तयारी करू नका अशी कार्यकर्त्यांना वारंवार विनंती केलीय. त्यांच्या मनातील उत्साह साहजिक आहे. भेटायला येतील, थांबतील, माझं स्वागत करतील. पण कुठलाही बडेजाव न करण्याची विनंती आम्ही नेहमीच करतो. तसे आमचे कार्यकर्ते समजूतदार आहेत. कुठल्याही दिखाव्याकडे त्यांचा कधीच कल नसतो,” असं प्रीतम मुंडे यांनी नमूद केलं.

“मी जिल्ह्यात नेहमीच असते, ते सिद्ध करण्याचा हा दिवस नाही”

राजकीय आरोपांवर प्रश्न विचारला असता प्रीतम मुंडे म्हणाल्या, “मी जिल्ह्यात नेहमीच असते. ते सिद्ध करण्याचा हा दिवस नाही. माझा जिल्हा अडचणीत आहे आणि मी दुसरीकडे आहे असा एकही दिवस नव्हता. मी केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी पक्षाची खासदार म्हणूनही जिल्ह्यात होते आणि आज राज्यात विरोधी पक्षाची लोकप्रतिनिधी म्हणून देखील आम्ही आहोत.”

हेही वाचा : दसरा मेळाव्याआधी निर्बंध शिथिल; सभागृहांत २०० पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीस मुभा

“आमचा दिवस राजकीय गोष्टींचा नाही. २ वर्षानंतर जीवन पुन्हा रुळावर येतंय. त्याविषयी लोकांमध्ये उत्सूकता आहे. असं असल्यानं राजकीय चर्चा न करता आजच्या दिवशी चांगली सुरुवात करावी अशी इच्छा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp pritam munde comment on political allegation in beed pbs