महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मत फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. शिवसेनेनं काल आपल्या आमदारांना एका हॉटेलमधून दुसऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवलं होतं.
याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची अवस्था मांजरांच्या पिल्लांसारखी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या पक्षाची मतं फोडण्याऐवजी दानवे यांनी आपल्या घरातील मत सुरक्षित ठेवावं. रावसाहेब दानवे यांचा मुलगाच आपल्याला मतदान करेल, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सत्तार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार म्हणाले की, “महाविकास आघाडीची मतं फोडण्याच्या घोषणा काही लोक करत आहेत. त्यामुळे माझं रावसाहेब दानवेंना थेट आवाहन आहे की, त्यांनी आपल्या घरातील मत सुरक्षित ठेवावं. दानवे यांचा मुलगाच आम्हाला मतदान करेल, त्यांनी आमची मतं फोडण्याऐवजी आम्हीच त्यांची मतं फोडू, असंही सत्तार यावेळी म्हणाले. दानवे यांचे पूत्र संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?
महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची अवस्था माजरांच्या पिल्लांसारखी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अपक्षाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर आता त्यांना हॉटेलमध्ये बंदिस्त करण्यात आलं आहे. प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे. त्यांना मतदान करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं, असं दानवे म्हणाले होते. महाविकास आघाडीला भाजपाची भीती नाही, तर अपक्ष आमदार कधीही सोडून जातील, याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची अवस्था माजरांच्या पिल्लांसारखी झाली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.