गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी बमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात आणि मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारनं उपाययोजनांची ब्लू प्रिंट द्यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही”

संभाजीराजे भोसलेंनी उपोषण सुरू करताना आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं नमूद केलं आहे. “सगळ्यांना एका छताखाली कसं आणता येईल, या दृष्टीने माझा लढा आहे. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे”, असं ते म्हणाले.

“मी काही आजच टपकलो नाही”

“मी २००७ पासून महाराष्ट्र फिरतोय. मी आजच टपकलो नहीये. मी शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने महाराष्ट्र पिंजून काढला. यातून आम्ही आरक्षण समाजाला का गरजेचं आहे याची जनजागृती केली होती. २०१३ ला मी महाराष्ट्रात फिरत असताना मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन सांगितलं की राजे तुम्ही नेतृत्व करणं गरजें आहे. त्यामुळेच २०१३ला आझाज मैदानात आम्ही मोर्चा काढला होता. त्यानंतर नारायण राणे समिती स्थापन झाली”, असं ते म्हणाले.

“…तर मग काय उपयोग?”

“मी जी चळवळ सुरू केली आहे, त्यात समाजाला का वेठीला धरायचं? म्हणून मी ठरवलं, जे होईल ते होईल, आपण उपोषण करायला हवं. या मागण्यांसाठी मी स्वत: उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वैभवात मी राहिलोय, ते पाहाता हे कठीण काम आहे. हे जाहीर केलं, तेव्हाही मला वाटलं हे मला जमेल का? पण माझा जन्म छत्रपतींच्या घराण्यात झाला आहे. मी जर हा लढा सोडवू शकलो नाही, तर मग काय उपयोग?”, असं संभाजीराजे भोसले म्हणाले.

आमरण उपोषण कशासाठी? खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “४०० कोटी रूपयांच्या…”

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मागासवर्ग आयोगाची घोषणा शुक्रवारी केली. यासंदर्भात विचारणा केली असता संभाजीराजे भोसले यांनी त्यावर निशाणा साधला. “एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? हा प्रश्न आहे. फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असं वक्तव्य येता कामा नये. माझ्या माहितीनुसार हे कायदेशीर नाही”, असं ते म्हणाले. “तुम्ही या अर्थसंकल्पात आमच्या मागण्यांसदर्भात तरतूद करा. ब्लू प्रिंट दाखवा. आर्थिक नियोजन सांगा. तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या करा”, असं देखील ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp sambhaji raje bhosle indefinite hunger strike for maratha reservation pmw