राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सोमवारी लोकसभेत “दत्त दत्ता, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दहीचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप” अशी मराठी कविता वाचून दाखवली. या कवितेतील देव दत्त आणि गाय सोडली तर केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुंदर उदाहरण दिलं, पण तीच राष्ट्रवादीची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, “इतके दिवस आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांच्या सरकारकडे करत होतो. पण त्यांनी दारुवरचा कर कमी केला. पण पेट्रोल-डिझेलवरचा कर कमी केला नाही, याचंही उत्तर त्यांनी द्यायला हवं.”

पुढे त्यांनी म्हटलं, “आरोप-प्रत्यारोप होत असताना सुप्रिया सुळेंनी सुंदर उदाहरण दिलं आहे. पण हीच राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे. त्यांनी दुधातून निघणारा कोणताही पदार्थ सोडलेला नाही. सत्तेच्या माध्यमातून जे-जे काही काढता येईल, मग तो पैसा असेल, भ्रष्टाचार असेल, वेगवेगळ्या पक्षातून लोकांचं प्रवेश करणं असेल, दबावतंत्र वापरणं असेल, लोकांवर गुन्हे दाखल करून पक्षप्रवेश करून घेणं असो, असे अनेक प्रकार त्यांनी केले.”

हेही वाचा- “…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान

“सुप्रिया सुळे यांनी जी कविता म्हटली, याचा मला आनंदच आहे. पण ती कविता पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसलाच लागू होते. कारण त्यांनी सरकारमध्ये असताना ना दूध सोडलं, ना तूप सोडलं, ना लोणी सोडलं, त्यांनी काहीच सोडलं नाही. त्यांनी गायदेखील सोडली नाही. आम्ही किमान गायीवर तरी टॅक्स लावला नाही, पण त्यांनी गायदेखील सोडली नाही, असं माझं ठामपणे मत आहे” अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

Story img Loader