मागील काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समुदायात तणाव निर्माण झाला होतं. तर काही दंगलखोरांनी तोडफोड आणि जाळपोळ केली होती. अहमदनगरमध्येही हिंदू-मुस्लीम दंगल घडली. दरम्यान, शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी हा मोर्चा काढला होता.
या घडामोडीनंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर आणि स्टेटसमुळे राज्यात हिंसाचार घडत आहे, अशा आशयाचं विधान सुजय विखे पाटील यांनी केलं. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- भाजपाने तुम्हाला ऑफर दिली आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले, “मोबाईलवरील वादग्रस्त मेसेज आणि स्टेटसमुळे राज्यात हिंसाचार घडत आहे, हे या समाजाचं दुर्दैव आहे. मोबाईलवर बंदी आणण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मोबाईलवरून कुणी काहीही मेसेज टाकतो, यामुळे कुणाच्या तरी भावना दुखावतात. त्यानंतर भावना दुखावणारे वेगळेच असतात, पण तोडफोड आणि जाळपोळ वेगळेच लोक करतात. यात आरोपी वेगळेच असतात. असं वातावरण समाजासाठी फार घातक आहे, या मताचा मी आहे. याचं नियंत्रण कसं करावं? हा मुख्य प्रश्न आहे. यासाठी आई-वडिलांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे.
खासदार विखे पाटील पुढे म्हणाले, “राज्यात अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. लव्ह जिहाद, मुली पळून जाणं, मुलींची छेड काढणं, सोशल मीडियावर शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिणं किंवा व्हिडीओ अपलोड करणं, अशा अनेक घटना घडत आहेत. आई-वडिलांनी मुलांना योग्य संस्कार न दिल्याने अशा घटना वाढल्या आहेत. कारण वडील दिवसभर कामानिमित्ताने बाहेर असतात. आई घरातल्या कामात व्यग्र असते. त्यामुळे आई वडिलांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.”
हेही वाचा- सरकारचा जाहिरातबाजीवर दिवसाला २० लाख रुपये खर्च; रोहित पवारांनी शेअर केली आकडेवारी, म्हणाले…
“त्यामुळे मी सगळ्या आई-वडिलांना विनंती करेन की, तुम्ही तुमच्या मुलाबरोबर बसलं तर हा प्रश्न सुटेल. अन्यथा आपलं महाराष्ट्र किंवा आपला जिल्हा अत्यंत वाईट अवस्थेत जाईल. जिल्ह्याचा विकास होत राहील पण सध्या जे काही सुरू आहे, हे कुणीच थांबवू शकणार नाही. अशा घटना थांबवणं एखाद्या खासदाराचं किंवा पोलिसांचंही काम नाही. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाची जबाबदारी घेतली, तर सामूहिक प्रयत्नांमधूनच सामाजिक शांतता ठेवता येईल”, असंही सुजय विखे पाटील यांनी नमूद केलं.