पानटपरीवर विडी मिळते तशी ईडीची अवस्था झाली आहे. माझ्या हातात ईडी द्या मग मी दाखवतो या सगळ्यांना, असे म्हणत भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन भाष्य केले आहे. सध्या ईडी म्हणजे चेष्टा झाली आहे. त्यांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील असे उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात कास येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
उदयनराजेंनी बुधवारी साताऱ्यातील कास परिसरातील कामाची पहाणी केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना सध्याच्या परिस्थितीकडे कसे पाहता असे विचारले यावर त्यांनी सडेतोड उत्तरे देत महाविकास आघाडीसह इतर नेत्यांवर टीका केली.
“सध्याची परिस्थिती कोणी बिघडवली याचा विचार केला पाहिजे. माझं आवडतं चॅनेल ‘टॉम ॲण्ड जेरी’ हे सुद्धा बघायचे बंद केलं आहे. आता सध्या सुरू असलेल्या माकडउडया बघत बसतो. खूप मजा येते. कोण कोणाला आत टाकते, कोण कोणाला मारते. कोण म्हणते हा मुख्यमंत्री आहे का, काय बोलणार यावर,” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेबाबतही उदयनराजे यांनी भाष्य केले आहे. “कोल्हापूरला उत्कृष्ठ सभा झाली. भरपूर चांगली गर्दी झाली होती. एवढी लोक आली पण तुमची डिलीवरी काय होती? तर झिरो. तुम्ही लोकांना काय दिलं? या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या मग दाखवतो या सगळ्यांना,” असा इशारा उदयनराजे यांनी दिला.
“पानटपरीवर विडी मिळते ना तशी ईडीची अवस्था झाली आहे. त्यांना ताब्यात घ्या. दांडक्याने सडकून काढले पाहिजे. एका बाजूला लोक फुटपाथवर झोपत आहेत आणि या लोकांना दिसत नाही. हे मात्र एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्षे ते जेलमध्ये होते पण त्यांनी काय केले नाही. जे आता जेलमध्ये आहेत त्यांनीही काय केलेले नाही. लोकांना काय डोळे, मेंदू नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
“आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. पण माझे नाव कोणी घेतले तर बघतो. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागू नये,” असा इशाराही उदयनराजेंनी दिला.