गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त -फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याच प्रकल्पावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला आहे.
वेदान्त प्रकल्पावरून आशिष शेलार यांनी २ ट्वीट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी १०% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल्याची आठवण शेलार यांनी करून दिली.
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ‘वेदान्त-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? १० टक्के नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे’. असे मत आशिष शेलार व्यक्त केलं आहे.
अजित पवारांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका
वेदान्त प्रकल्पावरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या आरोपांविषयी विचारणा होताच त्यावरून सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतलं आहे. “हे धादांत खोटं आहे. आता तीन महिने झाले यांना मुख्यमंत्री होऊन. कंपनीचं ते ट्वीट आल्यानंतर हे सगळं समजलं. आज ९० दिवस काही कमी नाहीयेय. स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठे प्रकल्प वगैरे याबात प्रयत्न करायला हवे होते”. राज्याच्या हिताचे प्रकल्प आणल्यास आम्ही सरकारला सहकार्य करू, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “अजूनही त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणावा, दुसरेही प्रकल्प आणावेत. राज्याच्या हिताचे, पर्यावरणाला धक्का न पोहोचवणारे प्रकल्प त्यांनी आणावेत. त्यासाठी आमची संमती आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत, असेही पवार म्हणाले.