Ashish Shelar : विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता भाजपाचं शिर्डीत प्रदेश महाविजय अधिवेशन पार पडत आहेत. या अधिवेशनाला राज्यातील भाजपाचे सर्व नेते तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील उपस्थित आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं हे अधिवेशन महत्वाचं मानलं जात आहे. या अधिवेशनात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या अधिवेशनात बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता आशिष शेलार यांनी शेरो शायरीतून उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. “तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं कमाल ये है की फिर भी तुम्हें यक़ीन नहीं”, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राला गुलामीत टाकू पाहत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे सांगत होते, वातावरण निर्मिती करत होते, सांगत होते की अब की बार भाजपा तडीपार, महाराष्ट्र द्रोही रावणाचे दहन करा, अशा प्रकारची वल्गना उद्धव ठाकरे करत होते. पण मी एक कार्यकर्ता म्हणून उद्धव ठाकरे यांचं ते ३१ जुलैचं भाषण कधीही विसरू शकत नाही”, असं म्हणत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला.
‘…तरी देवेंद्र फडणवीसांनी स्वभावानुसार उत्तर दिलं नाही.’
आशिष शेलार यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरेंनी वल्गना केली होती की देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी असा नडलो की त्यांना घाम फुटला. त्यांचं भाषण पाहताना कीव येते, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आम्ही असेच आहोत वाकड्यात गेलो की तोडून टाकतो, असंही त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले होते की, एक तर तुम्ही राहताल किंवा मी राहील. मात्र, तरीही देवेंद्र फडणवीस यांनी स्वभावानुसार काहीही उत्तर दिलं नाही”, असं म्हणत आशिष शेलारांनी ठाकरेंवर टीका केली.
आशिष शेलार यांचा शेरो शायरीतून निशाणा
आशिष शेलार यांनी असंही म्हटलं की, “उद्धव ठाकरेची मी तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला सांगतोय. तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं कमाल ये है की फिर भी तुम्हें यक़ीन नहीं”, अशा शेरोशायरीतून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.