वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यासोबतच सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला, असा देखील आरोप केला जात आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून यासंदर्भात राज्य सरकारला लक्ष्य केल्यानंतर आता त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण राहिलं नसल्याचा दावा केला होता. “हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. असं व्हायला नको होतं. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान; म्हणाले, “आजकाल टीव्ही लावला की…”!
“आम्ही सत्तेत असताना मला मंत्रालयात रोज देशातल्या आणि देशाबाहेरच्या गुंतवणूकदारांशी बोलण्यासाठी वेळ काढायला लागायचा. दोन तास रोज द्यावे लागत होते. आज आपण ते वातावरण निर्माण करू. हे वाद थांबवुयात”, असंही शरद पवार म्हणाले.
“आता आम्ही बघू”
शरद पवारांच्या याच विधानाचा संदर्भ घेत नारायण राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हतं. म्हणून इथून उद्योग गेले आहेत. आता उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. आम्ही बघू आता. समर्थ आहोत आम्ही”, असं राणे म्हणाले.
“सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.
“केंद्रीय मंत्री बारामतीत येऊन…”, भाजपाच्या ‘मिशन बारामती’वर शरद पवारांचा खोचक टोला!
“तडजोडीमुळेच उद्योग राज्याबाहेर गेले”
दरम्यान, “विरोधकांना कामधंदा काय आहे? विरोधकांनी आयुष्यात काय केलंय? अडीच वर्ष मातोश्रीवरच राहून सरकार चालवलं. सगळ्या तडजोडीच केल्या आहेत. तडजोडीमुळेच हे उद्योग गेले आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेले आहेत”, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.