सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी गरिबी पाहिली नाही. त्यांना गरिबीचा अनुभव नाही, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अडथळ्यांतून मार्ग काढणारा आहे. नरेंद्र मोदी गरिबीमुळे चहा टपरीवाले होते. ते आता देशात ६० वर्षांनंतर नवीन इतिहास घडविण्यासाठी परिवर्तनाची हाक देत आहेत. त्या परिवर्तनाच्या इतिहासात आपलाही सहभाग हवा म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेंद्र मोदी यांच्या बदनामीच्या कटकारस्थानावर सर्वानी पेटून उठले पाहिजे, असे आवाहन मुंबई शहर भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी येथे केले.
भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या १८२ फूट उंच स्मारकाच्या उभारणीच्या नियोजनाच्या निमित्ताने आयोजित सावंतवाडी विधानसभा भाजप बुथस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे मुंबईतील अचानक ठरलेल्या कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून त्यांच्याऐवजी आमदार शेलार आले होते. या वेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार प्रमोद जठार, भाजप माजी जिल्हाध्यक्ष आबा नाईक, महिला जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बुथस्तरीय कार्यकर्त्यांची उपस्थित आणि तिलारी प्रकल्पग्रस्त आणि टोलप्रश्न भाजपने सोडविला आहे. मग या भागाचा आमदार भाजपचा असेल तर सर्व समस्या सोडविणे शक्य आहे, असे आमदार शेलार म्हणाले. सामान्य माणसाची कल्पनाशक्ती जेथे संपते तेथे नरेंद्र मोदी यांची कल्पनाशक्ती सुरू होते, असेही ते म्हणाले.
सौराष्ट्र संघ स्थापन करणाऱ्या पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल एकात्म भारताचे शिल्पकार होते. गांधी-नेहरू घराण्याने देशाचे भले केले, तेवढीच देशभक्तीची ज्योत पटेल यांनी गावागावांत पोहोचविली. स्वातंत्र्य मिळाले, सुरक्षा मिळाली नाही आणि अद्यापि सुराज्यही मिळालेले नाही. म्हणून नरेंद्र मोदी परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन देशात इतिहास घडविण्याच्या या प्रवाहात सर्वानी सामील व्हावे, असे सांगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारक व त्यातील कल्पनेचे सादरीकरण आमदार शेलार यांनी पडद्यावर करून माहिती दिली.
श्रेष्ठ भारताची कल्पना भाजप, नरेंद्र मोदी यांनी आणली आहे. जगातील पटेल यांचे भव्य स्मारक आपणा सर्वाच्या साथीने, लोकसहभागातून होणार आहे. देशाच्या इतिहासाचे हे सोनेरी पान नरेंद्र मोदींनी उघडले आहे, असे सांगत येत्या २२ डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या बुथस्तरीय महामेळाव्यास पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, अध्यक्ष राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींनी देशातील आंध्र प्रदेश, हैदराबाद, केरळ अशा प्रत्येक राज्यात परिवर्तनाची हाक दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटकारस्थानाला मूठमाती द्या, असे आवाहन करून नरेंद्र मोदींना काँग्रेसने जंग-जंग त्रास देण्याचा प्रयत्न करून बदनामीचा कट रचला आहे. शेवटी चारित्र्यावरही शिंतोडे उडविले आहे, पण नरेंद्र मोदी काँग्रेसच्या कटकारस्थानाला पुरून उरल्याचे आमदार शेलार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा