भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी आज मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मालवण नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं. आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? असा सवाल करत निलेश राणे यांनी सर्वांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना खडे बोल सुनावले. यावेळी निलेश ऱाणे यांनी आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे असा दम दिला. सत्ताधाऱ्यांसोबत मिळून मालवण शहराची वाट लावली असा आरोपही त्यांनी केला.
मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे गटार साफसफाईची पोलखोल झाली. बाजारपेठांसहित अनेकांच्या घरात पाणी गेल्याने नगरपरिषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. स्थानिकांनीही याबद्दल नाराजी जाहीर केली होती. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे मालवण नगरपरिषदेत पोहोचले.
पाहा व्हिडीओ –
यावेळी माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांचा कार्यकाळाचा पाढाच वाचला. निलेश राणे यांनी यावेळी त्यांनी तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? अशी विचारणा केली. तसंच मी याआधीही तुम्हाला एका वाईन शॉपची तक्रार दिली होती, पण तुम्ही कारवाई केली नाही याची आठवण करुन दिली.’आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा गप्प बसलो नाही. आज तर आमचीच सत्ता आहे. आता टेबल फिरलं आहे. आज काय करणार आहात?,” अशी विचारणा यावेळी निलेश राणेंनी केली. तुम्ही शहराचं वाटोळ लावलं आहे सांगत ती फायर ब्रिगेडची गाडी गल्लीत जाणार का? असं निलेश राणेंनी विचारलं.आमच्या वाकड्यात जाऊ नका असं गेल्यावेळी सांगितलं होतं, आज ते आमदार आहेत का तुम्हाला वाचवायला असंही ते म्हणाले. ठराविक नगरसेवकांच्या मतदारसंघात नालेसफाई करायचं ठरवलं आहे का? असंही त्यांनी विचारलं. “मी तुमच्या हातात निवेदन देणार नाही, आपले हात पवित्र नाहीत. त्यामुळे टेबलावरचे निवेदन उचलून दिलेली कामे तातडीने मार्गी लावा,” असं निलेश राणेंनी यावेळी सांगितलं.