भारताच्या पूर्व किनारपट्टीवर Yaas चक्रीवादळाचं थैमान सुरू असताना महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीवर धुडगूस घातलेल्या तौते चक्रीवादळाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. या वादळाचा फटका महाराष्ट्रासह इतरही राज्यांच्या किनारी भागांना बसला आहे. महाराष्ट्रातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील भागाला मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दिलं आहे. मात्र, त्यावर विरोधकांकडून तोंडसुख घेतलं जात आहे. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि सध्या भाजपा असा प्रवास केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता, तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते” अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे.
तौते चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यांना निसर्ग चक्रीवादळा नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं देखील आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. मात्र, गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना अजूनही मदत मिळाली नसल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे.
ठाकरे सरकार ज्योतिषासारखे तारखा देतंय!
भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तौते चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा संदर्भ घेऊन त्यांनी लिहिलंय, “हे घ्या, अजून एक पोकळ आश्वासन. पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता, तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले, एक कवडी दिली नाही. अनेक गावांत अजूनही लाईट नाही. रॉ मटेरियल (कच्चा माल) नाही. पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषासारखे तारखा देत आहेत”.
फडणवीसांनीही केली होती टीका
याआधी देखील राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना न मिळालेल्या मदतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारने काही घोषणा केल्या होत्या. पण तीही मदत मिळालेली नाही. तेव्हा पूर्ण वाड्या उन्मळून पडल्या होत्या. त्यावेळी मदतीची अपेक्षा होती. पण ती मिळाली नाही. प्रतिझाड ५० ते १०० रुपये अशी मदत मिळाली आहे. आता हा दुसरा झटका आहे. एकीकडे लॉकडाऊन, करोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत. वर्षभरातच दुसरा झटका लोकांना बसला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की सरकारने भरघोस मदत करायला हवी”, असं फडणवीस म्हणाले होते.