विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड समोर आली. शिंदे गट फुटून निघाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा केली आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गटाकडून या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. “शिवसेनेशी कुणीही युती करायला तयार नाही, उद्धव ठाकरेंवर खूप वाईट काळ आलाय”, असं विधान शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळेंनी केलं होतं. त्यानंतर भाजपा नेते निलेश राणेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यावरून उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
नेमकं काय घडलं?
अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी या युतीचं स्वागत केलं होतं. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काय म्हणाले होते बावनकुळे?
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना टीका केली आहे. “संभाजी ब्रिगेडने २०१९मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्राला आव आणून सांगत आहेत. पण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे”, असं बावनकुळे म्हणाले होते.
दुहीचा शाप, संघाची विचारसरणी आणि असंगाशी संग.. संभाजी ब्रिगेडशी युतीनंतर उद्धव ठाकरेंची टोलेबाजी!
दरम्यान, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे सैराट मित्रमंडळाशी देखील आता युती करतील, असा टोला लगावला आहे. निलेश राणेंनी यासंदर्भात एक ट्वीट करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आङे की ते सैराट मित्र मंडळाशीही युती करतील”, असं या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर पुढील निवडणुका देखील आम्ही सोबत लढवू शकतो, असे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडसोबतची त्यांची युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात आहे.