राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. सेवेत सामावून घेण्याचं निवेदन देण्यासाठी वेळ न दिल्याने करोना काळातील कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन थेट अजित पवार यांचा ताफाच अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असता दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. दरम्यान, या घटनेवरून भाजपा नेत्यांनी टीका केली असून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांकडे माणुसकीसुद्धा नसल्याचं म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. “बीडमध्ये उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना काय वागणूक मिळाली बघा,” असं सांगत निलेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे.
अजित पवारांचा ताफा अडवणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
“अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मीडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे.
बीड मधे उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलाना काय वागणूक मिळाली बघा. अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मिडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे 10 सेकंड थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही. pic.twitter.com/GudrUCfrcg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 18, 2021
भाजपा आमदार सुरेश धस यांचीही टीका
घटनेवरून आक्रमक होत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलं. “आरोग्यमंत्री केवळ जालना जिल्ह्यपुरतेच आहेत का? त्यांच्या जिल्ह्यला एक आणि इतर जिल्ह्यला एक न्याय कसा,” असा प्रश्न उपस्थित करत आमदार धस यांनी सरकारच्या दंडेलशाहीविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराच दिला.
“करोनाच्या काळात सख्खा भाऊ किंवा आई-वडीलही जवळ येत नव्हते. त्यावेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम केले. अशा कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक होते. नोकरी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढले हे सरकारच्या अकार्यक्षमतेचेच प्रतीक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कृती समिती स्थापन करून राज्यभर आंदोलन उभे करावे. आपण सर्व सहकार्य करू,” अशी ग्वाहीही आमदार धस यांनी दिली.