महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलेले भाजपा नेते किरीट सोमय्या शनिवारी दापोली दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांचं दापोलीमधील मुरूड येथे असणाऱ्या रिसॉर्टची ते पाहणी कऱणार आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असताना त्याच्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही याची विचारणाही ते प्रशासनाला करणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या यांना दापोलीतच रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी उत्तर दिलं असून आम्ही हातावर हात ठेवून बसणार नसल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
“किरीट सोमय्या अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई का होत नाही यासाठी दापोलीत येणार आहेत. आम्ही सर्व सोबत असू. एका खासगी मालमत्तेवर रिसॉर्ट उभं करणं योग्य नाही. अनिल परब काय ढगातून खाली पडलेले नाहीत, सर्वांना समान न्याय आहे. कोणीही असलं तरी कारवाई झाली पाहिजे. यासंबंधी प्रशासनाला विचारण्यासाठी जाणं योग्य नसेल तर मग काय लोकशाही संपली आहे का? बंगाल, पाकिस्तान झाला आहे का?,” असं निलेश राणे म्हणाले.
“विरोध करण्याची भाषा केली जात आहे. पण आम्ही सर्वजण सोमय्यांसोबत आहोत. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची आहे. प्रकरणं चिघळलं तर आम्ही हात बांधून पाहणारे नाही. शिवसेना,राष्ट्रवादीने अशा धमक्या देऊ नयेत. अशा धमक्यांना आणि अशा लुख्यांना आम्ही भीक घालत नाही. उद्या दौरा होणार आणि यशसवी होणार,” असंही ते म्हणाले.
दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईवर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री मेहुणा अडकल्यावर लगेच अस्वस्थ झाले. त्यांची कंबरपण बरी झाली आणि बाकी दुखणं पण कमी झालं. नाहीतर दोन वर्ष महाराष्ट्र रडत होता तेव्हा मुख्यमंत्री इतके सक्रीय दिसले नाहीत. काल लगेच सभाग-हात येऊन भाषण केलं. मुख्यमंत्र्यांचा मेहुणा आहे म्हणून काय महाराष्ट्र लुटणार का? असे अनेक पाटणकर आत जाणार आहेत,” असा इशारा यावेळी निलेश राणेंनी दिला.
रिफायणारी प्रकल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले, “सरकार शिवसेनेचे आहे. पैशांची गणितं बदलली असतील. यांना गांधीजीच लागतात आणि गांधीजीची काही देवाणघेवाण झाली असेल म्हणून यांना प्रकल्प हवा असेल. हा प्रकल्प फक्त भाजपामुळे येईल. हे लोक गावात गेले तर लोक मारतील अशी परिस्थिती आहे”.