राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर केलेल्या टीकेमुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असं मत शरद पवारांनी मांडलं आहे. यानंतर शरद पवारांवर टीका होत असून त्यांचं एक जुन पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलं होतं. भाजपा नेते निलेश राणे यांनीदेखील हे पत्र शेअर केलं असून शरद पवारांवर टीका केली आहे.
निलेश राणेंची टीका
निलेश राणे यांनी ट्विटरला शरद पवारांनी १९७४ मध्ये लिहिलेलं एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केलं होतं.
पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही; शरद पवार यांचे मत
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत”.
शरद पवार काय म्हणाले आहेत –
धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.
…मग शरद पवार नेमके कोणते? बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेनंतर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा बोचरा सवाल
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं, त्या प्रसंगी पवार बोलत होते. शाहू महाराज छत्रपती, न्या. बी. जी. कोळसे पाटील, श्रद्धा कुंभोजकर, डॉ. पी. डी. जगताप, राजकुमार घोगरे आणि चंद्रशेखर शिखरे या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. अन्य घटकांचे महत्त्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास आणि दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना दिशा फक्त जिजाऊ यांनीच दिली. पुरंदरे यांनी केलेली मांडणी सत्यावर विश्वास ठेवणारे कधीही मान्य करणार नाहीत.