रत्नागिरीमधील हातिवले टोलनाक्यावर होणाऱ्या टोलवसुलीला माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध केला आहे. राजापूर तालुक्यात महामार्गाचे काम अपूर्ण असूनही अनधिकृतपणे हातिवले गावात टोल वसुली सुरु केल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निलेश राणे आपल्या समर्थकांसह हातिवले टोलनाक्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. काम पूर्ण होईपर्यंत टोल भरला जाणार नाही अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
“तुम्ही आपलं कर्तव्य बजावत आहात, याची मला कल्पना आहे. पण हे कर्तव्य नव्हे. काम अर्धवट असताना टोल का सुरु केला आहे याचं कारण तुम्ही सांगत नाही. उगाच आम्हाला संघर्ष करायला लावू नका. काम पूर्ण झाल्यानंतर टोलवसुली सुरु करा, आम्ही विरोध करणार नाही,” असं निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं.
“माझ्यासाठी महामार्ग म्हणजे महामार्ग आहे. एका बाजूचे ५० किमी झाले मग दुसऱ्या बाजूचं काय? ठेकेदाराला दिलेल्या पॅकेजमध्ये तुम्ही टोल मोडू नका. मी पुन्हा एकदा सांगत आहोत की वरिष्ठांशी बोला आणि निर्णय द्या,” असंही त्यांनी सांगितलं. नकाशा पाहून आमचे रस्ते ठरावायचे नाहीत असंही ते म्हणाले.
दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश राणे यांनी सांगितलं की “कोणालाही विश्वास न घेता हा टोल सुरु करण्यात आला. काल काही वेळासाठी आमच्या लोकांनी हा टोल बंड पाडला होता. रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे टोल बंद करण्यास सांगण्यात आलं. स्थानिकांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नसताना, हा टोल सुरु कऱण्यासाठी इतकी घाई कशासाठी केली जात आहे. अधिकाऱ्यांकडे टोल सुरु करण्यासंबंधी कोणतीही कागदपत्रं नाहीत. टोल थांबवत नाही तोपर्यंत जागेवरुन हटणार नाही”.