नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाकडून आज दिवसभर नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणावरून वेगवेगळी नेतेमंडळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. एकीकडे आशिष शेलार, माधव भांडारी यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर टीकास्त्र सोडलेल असताना दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. “कुणी सांगावं, नवाब मलिक हेच दाऊदचे फ्रंटमॅन असतील”, असं विधान निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक शरद पवारांच्या अतिशय जवळ आहेत. त्यांना सत्र न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर लगेच महाविकास आघाडीचे सगळे नेते जे इतर वेळी राज्याच्या मोठ्या प्रश्नावर बोलताना दिसले नाहीत.
“मलिक आता जे. जे. मध्ये आडवे झाले”
निलेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. “नवाब मलिक इडीच्या कार्यालयातून मूठ वर करून बाहेर आले. जसे काही फार मोठे स्वातंत्र्यसैनिक आहेत. युद्ध जिंकून आलेत. मुंबईभर बॅनर लागले ‘मैं झुकेगा नहीं’ ते आता जे. जे. मध्ये आडवे झाले. त्यांचे हात खाली गेले, पाय वर आले आता तिथे आडवे झाले”, असं निलेश राणे म्हणाले.
“..तर दाऊदला मलिकांसारखाच फ्रंटमॅन हवा”
दरम्यान, नवाब मलिक यांच्या जमीन खरेदी प्रकरणावरून निलेश राणेंनी यावेळी निशाणा साधला. “या व्यवहारानंतर मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले. दाऊदच्या माणसाकडून तुम्ही कवडीमोल भावाने मालमत्ता घेता. त्यात १०० टक्के काळा पैसा आहे. दाऊद देशाचा एक नंबरचा शत्रू, तुम्ही त्याच्याकडून मालमत्ता विकत घेता. कुणाला माहीत, दाऊद इब्राहिमचा खरा फ्रंटमॅन नवाब मलिकच असतील. दाऊदला जर रिअल इस्टेटच्या क्षेत्रात घुसखोरी करायची असेल, तर त्याला नवाब मलिक यांच्यासारखा फ्रंटमॅन हवाच आहे”, असं असा दावा निलेश राणे यांनी केला.
“२५ रुपये चौरस फूट किंमतीने जमीन मिळते का मुंबईत? लोकांना मूर्ख समजताय का? मूळ मालकाला पैसे जात नाहीत. हसीना पारकरला पैसे जातात. त्यानंतर मुंबईत ३ बॉम्बस्फोट होतात”, असं राणे म्हणाले.
“मग मलिकानी युक्रेनला जावं”
दरम्यान, नवाब मलिक यांना निलेश राणेंनी खोचक सल्ला देखील दिला आहे. ईडी कार्यालयातून बाहेर पडताना नवाब मलिकांचा मूठ वर केल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, “काय मोठा पराक्रम करून आलात? युद्ध जिंकून आला आहात का? मग युक्रेनला जा”!