ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या राज्य सरकारमधील काही मंत्री आणि इतर नेत्यांविरोधात कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते, असं निलेश राणे म्हणाले आहेत. कुडाळमध्ये घेतलेल्या पत्रकारक परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. तसेच, अजित पवार अजूनही जामिनावरच बाहेर आहेत, असं देखील ते म्हणाले आहेत.
“बँक टिकवायची कशी, हे अजित पवारांना कळलेलं नाही”
जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “जिल्हा बँक महाविकासआघाडीच्या हातातून कधीच गेली आहे. म्हणून त्यांना अजित पवारांकडून एक्सटेन्शन मिळाले. अजित पवारांनी जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी मदत केली. आता निवडणूक होईल, तेव्हाही आम्हीच जिंकणार आहोत. पण त्यंना एवढा काळ का लागला, कारण त्यांना ती बँक टिकवायची कशी, हेच कळलेलं नाही”, असं निलेश राणे म्हणाले.
“त्यांनी जे काही धंदे करून ठेवलेत, ते उद्या आम्ही निवडून आल्यावर उघड होणार. अजित पवार आज बाहेर आहेत उद्या आतही जातील. ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक केसेस आहेत. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. म्हणून अजित पवार त्यांना (स्थानिक नेत्यांना) आता काही वाचवू शकणार नाहीत”, असं निलेश राणे म्हणाले.
राज्य सरकारवर बोचरी टीका
“राज्यात ते आपापलंच दुकान बघतायत. राष्ट्रवादी शिवसेनेला धरूनच सगळ्या गोष्टी चालवतंय असं नाही. तिथेही सगळे आपापलं दुकान मांडूनच चाललेत. शह-काटशह सुरूच आहेत. यांचा हेतूच फक्त पैसे, सत्ता, सत्तेतून पैसा हा आहे. पैसा मिळवण्यासाठीच ते सत्तेत आहेत. ही आघाडी महाराष्ट्रानं स्वीकारलेली नसून तडजोडीतून आलेली आघाडी आहे. त्यांना जिथे कुठे फावडा मारायला संधी दिसेल, तिथे ते मारणार. ही काही जनतेसाठी आघाडी झालेली नाही. तीन डाकू एका गावावर डाका टाकण्यासाठी एकत्र येतात, तसं आहे हे”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
“…हे लोकशाहीमध्ये चालतं का?”, राज्यपालांविषयीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला सवाल!
“रोज मंत्री वेगवेगळ्या भ्रष्टाचारांमध्ये अडकतायत. धनंजय मुंडेसारखे मंत्री यूपीतले डान्सर बोलवून कार्यक्रम करतायत वाढदिवसाला. जितेंद्र आव्हाड इंजिनिअरला घरात घेऊन मारतायत. अंगावर आलं की केंद्रावर ढकलायचं हेच करतायत”, असंही निलेश राणे म्हणाले.