पावसाळी अधिवेशनात हिंदू तरुणींच्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित करणारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील काही विवाहसंस्था मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींचं धर्मातर करण्यासाठी प्रोत्साहन आणि समर्थन देत असल्याचा दावा नितेश राणे यांनी ट्वीटमधून केला आहे. याआधी नितेश राणे यांनी हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा आरोप केला होता. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आल्यानंतर त्यांनी हे आरोप केले होते.
नितेश राणेंनी काय आरोप केले आहेत?
“महाराष्ट्रातील काही विवाहसंस्था मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहन आणि समर्थन देत आहेत. या विवाहसंस्थामध्ये फक्त २००० रुपयांमध्ये खोटी विवाह प्रमाणपत्रं दिली जात आहेत. अशा विवाहसंस्था बंद करुन, या लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे होईल याची आपण खात्री करु,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला होता मुद्दा –
“महाराष्ट्रासाठी हा फार गंभीर प्रश्न आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवलं जातं आणि त्यासाठी त्यांना ताकद दिली जाते,” असा आरोप नितेश राणेंनी केला होता.
पुढे ते म्हणाले होते “हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आलं आहे. शीख तरुणीला फसवलं तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर सहा लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षत्रिय तरुणीसाठी चार लाख असं रेट कार्ड आहे. तरुणींना विकण्यापर्यंत यांची मजल जात आहे. धर्म परिवर्तनाच्या नावाखाली मुलींचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे”.