राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील नातं काही लपून राहिलेलं नाही. राणे कुटुंबांकडून शिवसेनेवर नेहमीच कडवट टीका केली जाते. राणे पिता-पुत्रांकडून शिवसेनेसह उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरेंना नेहमी लक्ष्य केलं जातं. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात आणि कोकणात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पदभार स्वीकारताच नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले….
सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे नेते दीपर केसरकर, विनायक राऊत उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून काम करुन असं म्हणत अप्रत्यक्षपणे युतीला पाठिंबा दर्शवला.
कट्टर शिवसैनिक ते मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री; नारायण राणेंचा संघर्षमय प्रवास
“सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,” असं नितेश राणेंनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल”.
उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही
नारायण राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? असं विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, “नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचं मन इतकं मोठं नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो”. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली होती.