भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता उद्धव ठाकरेंना सुनावलं.

नाशिकमधील या मोर्चात नितेश राणेंसोबत इतर हिंदुत्ववादी संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या. नितेश राणे यांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी आता खरी मर्दानगी दाखवावी असं आव्हानच यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलं.

Maharashtra Breaking News Live: राज्यसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, क्षणोक्षणीचे अपडेट्स एका क्लिकवर

“पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारला जाब विचारणार आहे. मीच कसा हिंदू आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्या येणार आहेत. पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इतकी भीती वाटते की सकाळचं औषधही मुख्यमंत्री त्यांना विचारल्याशिवाय घेत नाहीत,” असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आमचं घर नव्हतं, आम्ही हवेत रहायचो : नितेश राणे

काश्मीरमधील हत्यांच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा”. मुख्यमंत्री असताना आमदारांना कोंडून ठेवावं लागतं, यातूनच काय उगवलं आहे हे कळतं असा टोला लगावताना नितेश राणे यांनी काहीही दावा असला तरी १० तारखेला काय ते स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी यावेळी केतकी चितळे प्रकरणाचाही उल्लेख केला. “शिवलिंग विटंबना प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. हिंदूहृदयसम्राटाचा मुलगा मुख्यमंत्री असताना अशा पोस्ट केल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात पोस्ट लिहिल्यास ताबडतोब कारवाई केली जाते. पण या प्रकरणी अद्याप कारवाई नाही. हीच पोस्ट इतर धर्मियांबाबत असती तर दंगल घडली असती. पवारांवर कोणत्या तरी मुलीने पोस्ट केली तर तिला जेलमध्ये टाकलं. हिंदू आहोत म्हणून शांततेत मोर्चे निघत आहेत,” असा इशारा यावेळी नितेश राणेंनी दिला.

आम्ही संयम सोडला तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची भाषा करु नये असंही नितेश राणे म्हणाले.

Story img Loader