एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते इम्तियाज जलील, वारीस पठाण यांची उपस्थिती होती. यावरुन टीकेची झोड उठलेली असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेली त्यांनी राज्य सरकारवही निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत जाहीर आव्हान दिलं आहे. “मी आव्हान करतो…पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन
याआधी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “ओवेसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“महाराष्ट्रातील हिंदूंना, शिवप्रेमींना नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न होता. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे लचके तोडले, आपल्या आई-वडिलांनाही सोडलं नाही, अत्याचार केले त्याच्या कबरीसमोर तुमच्या छातीवर उभं राहून नतमस्तक होतो आणि महाराष्ट्रातून दोन पायावर निघून जातो हा संदेश द्यायचा होता का? हा संदेश मिळाल्यानंतर ठाकरे सरकार ज्यांना हनुमान चालीसा चालत नाही, जय श्रीराम चालत नाही…लगेच देशद्रोहाचे गुन्हे टाकतात त्यांनी २४ तास उलटले असतानाही या प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केलेला नाही?,” अशी विचारणा नितेश राणे यांनी टीव्ही ९ शी बोलताना केली आहे.
“उद्धव ठाकरेंना जमत नसेल तर आम्ही आमदार, खासदार, भाजपा वैगेरे नंतर आहोत, आधी मराठा, शिवप्रेमी आहोत. जर संभाजीराजे, शिवरायांचा कोणी अपमान करत असेल तर फक्त १० मिनिटांसाठी अकबरुद्दीनला आमच्या हवाली करा. त्याला तिथेच रांगेत झोपवलं नाही तर महाराजांसमोर नतमस्तक होणार नाही,” असंही नितेश राणे म्हणाले.
“जो बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे त्याला हे पटलेलं नाही. ज्याचं रक्त भगवं आहे. ज्याच्या नसांमध्ये महाराज आहेत त्यांना झोप लागलेली नसणार. इतर वेळी पोलिसांच्या माध्यमातून हिंमत दाखवता ना…खरे मर्द असाल तर ओवेसीला त्याची जागा दाखवा. देशातील शिवप्रेमी चिडलेला आहे. उद्या कायदा सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार नाही. जर कोणी आम्हाला चिडवत असेल तर आम्हीदेखील सहन करणार नाही. जर कोणी आमच्या दैवतांचा अपमान करत असेल तर योग्य उत्तर द्यायला येतं,” असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं – संजय राऊत
“संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण कऱण्याचं ओवेसी बंधूंचं राजकारण दिसत आहे. पण मी इतकंच सांगेन की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल,” असं शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
“औरंगजेब काय महान संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं, मंदिरं उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी त्याच्यासोबत लढाई लढली आहे. पण आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो. औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.