शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली आहे. दरम्यान त्यांच्या अर्जावर बुधवारी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. याप्रकरणी गुरुवारी निकाल दिला जाईल असं न्यायालयाने सांगितलं होतं. यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र निर्णयाआधीच नितेश राणे यांना एक धक्का मिळाला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच नितेश राणे धक्का बसला असून मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. एकीकडे नितेश राणे अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात गेले असून त्यावर आज सुनावणी होत असताना दुसरीकडे या निर्णयामुळे त्यांना जामीन मिळाला तरी मतदान करता येणार नाही. १६ कोटींच्या थकीत कर्जामुळे सहकार विभागाने नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे.
संतोष परब हल्ला प्रकरण काय आहे?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान नितेश राणे यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच नोटीस बजावून कणकवली पोलीस स्थानकात बोलावलं होतं. पण कामात व्यस्त असल्याचं सांगत नारायण राणे यांनी हजर राहणं टाळलं.