“मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांनी हा लढा कशासाठी सुरू केला होता? मनोज जरांगे जी स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, ती नेमकी कुणाची आहे? कारण आम्हाला या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास यायला लागला आहे. हा लढा मराठा समाजाचा असेल तर तो मराठा समाजापर्यंत मर्यादीत ठेवावा. जर त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप करण्याचं राजकारण केलं आणि खालच्या पातळीवर येऊन टीका केली. तर सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप; म्हणाले, “सलाईनमध्ये मला विष…”
मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपाकडूनही त्यांच्यावर पलटवार करण्यात येत आहे. नितेश राणे वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. त्यामुळेच मराठा समाजानेही फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होत नसेल आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतील तर आम्हीही मराठेच आहोत. त्यांना तोंड देण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत.”
जरांगेंनी त्यांची नौटंकी बंद करावी
मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही टीका केली. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांनी त्यांची नौटंकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात-आठ महिन्यात त्यांनी आपला वरदहस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे त्यांनी आता जाहीर करावे. त्यांच्या मागे सिल्व्हर ओक आहे की, जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब? जरांगेंचे सत्य आता लोकांसमोर यायला लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. तरीही जरांगेंना सारखं सारखं फडणवीस यांचं नाव घ्यायलं लावलं जात आहे.”
मनोज जरांगे काय म्हणाले?
आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामागेही देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मला सलाईनमधून वीष पाजून मारण्याचा कट रचला. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर येतो मी सागर बंगल्यावर, मला मारून दाखवा”, असं आव्हान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं आहे.