उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या घराच्या परिसरात दगडं, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या घरावर पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर बोलताना “जशास तसे उत्तर” देण्याचा इशारा दिल्यानंतर यासंदर्भात आता भाजपा आमदार नितेश राणेंनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, भास्कर जाधवांनाही त्यांनी लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“..तर कार्यकर्त्यांचा राग अनावर होणारच ना?”

भास्कर जाधव यांनी मंगळवारी कुडाळमध्ये बोलताना नारायण राणे आणि नितेश राणेंचा उल्लेख ‘बेडूक, कोंबडीचोर, चरसी कार्ट’ असा केल्यामुळे नारायण राणेंना मानणारे कार्यकर्ते संतप्त झाल्याची शक्यता नितेश राणेंनी वर्तवली आहे. “भास्कर जाधव तोंड सुटल्यासारखे सगळीकडे बोलत आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांना मानणारा महाराष्ट्रात फार मोठा वर्ग आहे. या नेत्यांवर तुम्ही पातळी सोडून बोलायला लागलात, तर त्या त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर होणारच ना?” असं नितेश राणे म्हणाले.

“कुणाकुणाला थांबवणार तुम्ही?”

“आता तुम्हाला कुणावर राजकीय टीका करायची असेल, तर राजकारणापुरतेच बोला. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलाल, तर कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया देणारच. कुणाकुणाला थांबवणार तुम्ही? भास्कर जाधवांना जर बोलण्याची एवढी सवय आहे, तर या सगळ्या गोष्टींची सवयही त्यांनी ठेवली पाहिजे. राणेंना मानणारा वर्ग गप्प कसा बसणार? आम्ही तरी कार्यकर्त्यांना किती सांगणार?” असंही नितेश राणे म्हणाले.

दगड, स्टम्प आणि बाटल्या..भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न? पोलीस बंदोबस्त वाढवला!

“आम्हाला राज्यातली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडवायची नाहीये. पण शेवटी कार्यकर्तेही बघत आहेत. राजकारण सोडून जेव्हा नेत्यांवर कुणी खालच्या पातळीवर बोलत असेल, तर कार्यकर्त्यांना सांभाळणं आमच्याही हाताबाहेर जाणार. हल्ला कुणी केला हे पोलिसांनीच शोधून काढायला हवं. काल व्यासपीठावरून भास्कर जाधव ज्या पद्धतीने तोल सोडून बोलले, त्यावर त्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या असतील. आता पोलिसांनी याचा शोध घ्यायला हवा”, असं नितेश राणे म्हणाले.

विनायक राऊतांनाही टोला!

दरम्यान, टीव्ही ९ शी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये नितेश राणेंनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनाही टोला लगावला आहे. “विनायक राऊत फक्त कॅमेऱ्यावर बोलतात. ‘जशास तसं उत्तर’ ही पिपाणी ते वर्षानुवर्षं वाजवत आहेत. तरी ते तसं उत्तर देत नाहीत. द्यायला तर सांगा, आम्हीही वाट पाहात आहोत. कालचा मोर्चा भ्रष्टाचारविरोधी होता. वैभव नाईक यांच्याविषयी होता. पण त्यावर बोलण्याऐवजी तुम्ही अन्य नेत्यांवर बोलाल, तर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणार की नाही?” असं राणे म्हणाले.