काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं नाना पटोले म्हणाले असल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केलं.
नाना पटोले काय म्हणाले –
‘‘मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले असून यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मोदींबाबत पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य
“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
फडणवीसांकडून टीका
सर्वच राजकीय पक्षांकडून पटोले यांच्या विधानाची निंदा केली जात आहे. भाजपा नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.. असं विधान करतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
गडकरीही संतापले –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर करत ट्वीट केलं आहे. नाना पटोलेंना अटक केली जावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.
काँग्रेसने फेटाळले आरोप –
दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र पटोले यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पटोले यांचे विधान पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भातील नव्हते, असा दावाही त्यांनी केला. पटोले हे भाषण देत नव्हते तर ते लोकांच्या गराडय़ात होते. लोक तक्रारी करीत होते. भंडारा जिल्ह्यात ‘मोदी’ असे टोपण नाव असलेला गावगुंड आहे. त्याच्यासंदर्भात ते बोलले. शिव्या देणे, मारणे, संपवणे हे काँग्रेसची संस्कृती नाही. ती भाजपाची संस्कृती आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भाजपने ‘चोर’ म्हटले होते. काल चंद्रकांत पाटील हे संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलले हे सर्व महाराष्ट्राने बघितले, याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले.
नाना पटोलेंचं स्पष्टीकरण –
“जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.