केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी आज राजकारण म्हणजे १०० टक्के सत्ताकारण झालं आहे अशी खंतही व्यक्त केली आहे. नितीन गडकरींच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.
नितीन गडकरी काय म्हणाले ?
“राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता १०० टक्के सत्ताकारण झालं आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.
एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही- नितीन गडकरी
“मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावनाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
“आपलं सामाजिक आणि राजकीय जीवन समृद्ध व्हावं, त्यात दर्जात्मक बदल व्हावेत यासाठी व्यक्ती आणि नेतृत्वात गुणात्मक बदल झाला पाहिजे. गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. विचारांमधून, थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशी आपली संस्कृती आहे. माझं कल्याण व्हावं असं आपल्या संस्कृतीत लिहिलेलं नाही,” असं नितीन गडकरी यावेळी सांगितलं.
“माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं,” असंही गडकरी म्हणाले.