औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती येण्याआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये भांडणाला सुरूवात झाली आहे. औरंगाबादमध्ये भाजपशी युती केली नसती, तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गुरूवारी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपकडूनही लगेचच खैरेंना प्रत्युत्तर देण्यात आले. तुमचे अनेक पदाधिकारी बंडखोर म्हणून निवडून आले, त्यांच्यावर कारवाई केली नाही, असा सवाल भाजपने केला. चंद्रकांत खैरे यांनी मतदानाच्याच दिवशी आपली नाराजी बोलून दाखवली होती.
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युती धर्म पाळला नाही. युती झाली नसती तर बरे झाले असते, असे वाटावे एवढे ते चुकीचे वागल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मतदानानंतर बोलताना केला. बहुमत युतीचेच येईल, असे सांगत महापौर मात्र शिवसेनेचाच होईल, हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत. रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले, तर मीदेखील चार प्रदेशांचा प्रभारी आहे, असे सांगत त्यांनी दानवे यांनी नीट वागणूक न दिल्याचा आरोप केला.
महापालिका निवडणुकीत मतदान व तत्पूर्वी प्रचारादरम्यानही भाजपच्या नेत्यांनी बंडखोरांना साथ दिली. मी आणि शिवसेनेच्या इतर कोणाही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या बंडखोरांना मदत केली नाही. भाजपमध्ये गट-तट आहेत. आमच्यातही ते आहेत. मात्र, वरून आदेश आला की, आम्ही तो पाळतो. युती धर्म पाळला नाही याचे दु:ख होत आहे, असेही ते म्हणाले.
मतदानानंतर लगेचच भाजपवर तोफ डागत शिवसेनेने महापौरपदासाठी तयारी सुरू केली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आधी युतीधर्म पाळेल आणि त्यांच्याबरोबर नाहीच जमले तर अपक्षांकडे जाईल. मात्र, अपक्षांकडे जाण्याची गरज भासणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला ४२ आणि भाजपचे नगरसेवक मिळून बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेच्या नेत्यांनी महापौर पदासाठीची तयारी सुरू केली आहे.