शिवसेना ( शिंदे गट ) खासदार गजानन कीर्तिकर यांची भाजपाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्तरावर सत्तेची सर्व सूत्र भाजपाकडे आहेत. पण, महाराष्ट्राचा विचार केला, तर भाजपाला एकहाती सत्तेची सूत्र कधीच मिळाली नाहीत. मिळण्याची शक्यताही नाही, असं विधान गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गजानन कीर्तिकर म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावर भाजपाचे ३५० खासदार निवडून येतात. तर, महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेना नाही आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला २२ आणि भाजपाला २६ जागा असं वाटप झालं होतं. तेव्हा आमचे १८ खासदार निवडून आले, तर चार जणांचा पराभव झाला. भाजपाचे २३ जण निवडून आले, ३ जणांचा पराभव झाला. ही महाराष्ट्राची राजकीय स्थिती आहे.”
हेही वाचा : अजित पवार खरंच नाराज आहेत? संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्री ते…!”
“राष्ट्रीय स्तरावर भाजपाचे ३५० खासदार निवडून येत असले, तरी महाराष्ट्रातील स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात भाजपा कमकुवत आहे, असं मत नाही. पण, शिवसेनेपेक्षा भाजपा मजबूत आहे, असंही मान्य करणार नाही,” असं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.
भविष्यात भाजपा आणि शिवसेनेचं जागावाटप कोणत्या पद्धतीने असेल? असा प्रश्न विचारल्यावर गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२६ जागांवर शिवसेना आणि १६२ जागांवर भाजपाचे उमेदवार लढले होते. भाजपाचे १०२ उमेदवार जिंकले. तर, शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत याच पद्धतीने जागावाटप झालं पाहिजे.”