“काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली. भाजपाने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने मतदार व मतदारसंघ दोन्ही गमावले.” अशा शब्दांमध्ये भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव असून, काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत होती. तर, पोटनिवडणुकीत पुरोगामी विचारातून सुरू झालेला प्रचाराचा मुद्दा हिंदूत्वाच्या वळणावर येऊन ठेपला होता.

तर, “कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली तरी जवळपास ७७ हजार मते मिळवली. परंतु मतांचे गणित पाहायला गेले तर २०१४ मध्ये शिवसेनेला ६९ हजार आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा मिळून ७५ हजार मते पडली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४७ हजार, राष्ट्रवादीला १० हजार मते पडली होती. तर २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ९१ हजार मते मिळाली होती. मग कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे. शिवसेनेची हक्काची ४० ते ६० हजार मतदान असताना तिन्ही पक्षांची मिळून ९६ हजार मते आहेत. तर भाजपाची एकट्याची ७७ हजार मते आहेत. याचा अर्थ शिवसेनेच्या मतांमध्ये केवळ फूट नाही तर हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारलं आहे आणि हो, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा #EVM वरील विश्वास वाढेल ही अपेक्षा आहे.” असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलेलं आहे.

Maharashtra Kolhapur North By Election Result 2022 : “कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला”; मोठ्या विजयानंतर जयश्री जाधवांची प्रतिक्रिया

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेल्या सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते.