महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. आतापर्यंत जवळपास २८१ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपाकडून आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेत काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, शिवसेना आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा नेते पराग अळवणी आणि आशिष शेलार यांनी केला.
संबंधित आमदारांनी राज्यसभा निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांची मतं अवैध ठरवावी, अशी मागणी भाजपा नेते पराग अळवणी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी पराग अळवणी यांची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत झालेलं सर्व मतदान वैध पद्धतीने झाल्याचंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
मतदान करताना नेमकं काय घडलं?
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदान झाल्यानंतर मतपत्रिका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील मतदान केल्यानंतर जयंत पाटलांकडे मतपत्रिका दिली. असाच प्रकार शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्याकडूनही झाला.
हेही वाचा- Rajya Sabha Election 2022 Live : राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या २८८ पैकी २८५ आमदारांकडून मतदान
खरंतर, मतदान करताना प्रत्येक पक्षाच्या आमदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला एका अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. यावर भाजपानं आक्षेप घेतला आहे. स्वतःच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवायची असते मात्र कांदे यांनी स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला दिसेल अशी मतपत्रिका दाखवली, या कृतीमुळे हे मत बाद होतं, असंही भाजपाकडून म्हटलं आहे.
हेही वाचा – “भाजपाने जी कटुता पेरली त्याचे परिणाम…”, राज्यसभा निवडणुकीवरून नाना पटोलेंचं टीकास्त्र
पण आतापर्यंत झालेली सर्व मतं वैध असल्याचं म्हणणं निवडणूक अधिकाऱ्यांचं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मतदान होत असताना अशाप्रकारे आक्षेप घेण्याचा अधिकार सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना असतो, मात्र आतापर्यंत सर्व मतं वैध पद्धतीने झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.