राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या सदस्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही अनेक जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे टाकण्यात आले आहेत.
NIA, ED या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड केली असता, पुण्यात काही जणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचाही प्रकार समोर आला आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापत आहे. विरोधकांकडूनही राज्यसरकार आणि भाजपाला जाब विचारला जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका केली आहे.
“PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही?भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच PFI चा फायदा होतो.” असं सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – नाना पटोले
तर “ UAPA कायद्यानुसार PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती. पण केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? केंद्रात आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे, या सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का?” असे प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रतिक्रिया दिली आहे.