भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे संयमी असल्याच सांगत कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांना एक सल्लादेखील दिला आहे. ‘लोकमत टॉक’ कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी अनेक वैयक्तिक तसंच राजकीय प्रश्नांवर उत्तरं दिली. यावेळी त्यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री विधानावरुन आलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांवर आश्चर्य व्यक्त केलं. तसंच वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. विरोधकाच्या भूमिकेत असताना जास्त शिकण्याची संधी मिळते असंही त्यांनी स्प्ष्ट सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांच्यातील एक चांगला गुण आणि एक सल्ला काय देणार असं विचारण्यात आलं असता पंकजा मुंडेंनी सांगितलं की, “ते खूप संयमी आहेत हा त्यांचा चांगला गुण आहे”. तसंच सल्ला देताना सांगितलं की, “त्यांना काही वाटत असेल, गैरसमज होत असतील तर त्यांनी ते व्यक्त केलं पाहिजे”.

विधान परिषदेबाबत पंकजा मुंडे यांची मन की बात, पक्ष घेईल तो निर्णय मान्य असे जाहीर करत व्यक्त केली इच्छा

यावेळी पंकजा मुंडेंना आदित्य ठाकरेंबाबत विचारलं असता ते फार लहान असून क्यूट असल्याचं सांगितलं. ते कधी नकारात्मक बोलत नाही हे मला आवडतं असं सांगत त्यांनी कौतुक केलं. खूप काम करा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

सुप्रिया सुळेंचा जास्त परिचय नाही सांगत मला चांगला गुण सांगता येणार नाही पण त्या वडिलांची काळजी घेणाऱ्या आहेत त्यामुळे मी त्यांच्याशी जोडले जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं. शरद पवारांना जेव्हा त्या चप्पल घालत होत्या ते पाहून मी फार भावूक झाले. किती मोठं भाग्य आहे त्यांचं असा विचार माझ्या मनात आल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

बहीण भावाच्या प्रेमाचा जिव्हाळा; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मारली मायेची टपली

राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करणारं आहे असं सांगताना त्यांची भूमिका अजून व्यापक झाली पाहिजे असं मत पंकजा मुंडेंनी मांडलं. धनंजय मुंडेंबद्दल विचारलं असता पंकजा मुंडे यांनी ते फार भावनिक आहेत हाच चांगला आणि वाईट गुण असल्याचं सांगितलं.

“बाबांचा आवाज ऐकणं टाळते”

“कोविडमध्ये बराच वेळ मिळाला तेव्हा मला वडिलांची कमतरता जाणवली. कारण ते गेल्यानंतर दुसऱ्याच क्षणी मला त्यांच्या भूमिकेत जावं लागलं, निर्णय घ्यावे लागले. त्यावेळी इतकं जाणवलं नाही. बाबा वारल्यानंतर मी कधीच त्यांचे व्हिडीओ पाहिले नाहीत. पण एके दिवशी एका व्यक्तीने व्हिडीओ पाठवला, चुकून तो प्ले झाला आणि साहेबांचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकल्यानंतर मला हळवं व्हायला होतं म्हणून मी शक्यतो त्यांचं भाषण ऐकत नाही. हा आवाज अजूनही जिवंत आहे असं वाटत राहतं,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे विधान मी केलं नव्हतं”

“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे विधान मी केलं नव्हतं. पण त्यावरुन फार नकारात्मक प्रतिक्रिया आल्या याचं आश्चर्य वाटतं. ते वक्तव्य मी केलेलं नसलं तरी त्यात महाराष्ट्रावर किंवा लोकांवर आभाळ कोसळण्यासारखं काय होतं?,” अशी खंत पंकजा मुंडेंनी यावेळी व्यक्त केली.

Story img Loader