एखादी व्यक्ती चांगल्या भावनेने बोलते, तेव्हा एखादा शब्द वर खाली जाण्याची वाट पाहून बोभाटा करणं हादेखील महापुरुषाचा अवमान करणंच आहे असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो असंही त्यांनी सांगितलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना गहिवरुन आलं होतं. तसंच आपण आज मौन का बाळगलं होतं याचा खुलासा करत वादग्रस्त विधानं करणाऱ्यांवर टीका केली.
“आज मी का मौन बाळगलं असा प्रश्न सर्वांना पडला असेल. जिथे कोणीही बोलण्याची हिंमत करत नाही, तिथे हिंमतीने बोलतो तोच खरा नेता असतो. आणि जिथे सगळेच बोलत आहेत, कोणीच थांबत नाही, श्रेयवादाची लढाई सुरु आहे अशा स्थितीत मौन बाळगतो तोच खरा नेता असतो. हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. गेल्या दिवसांतील काही घटनांच्या निषेधार्थ मौन होतं. कोणी व्यक्ती नव्हे तर प्रवृत्तीच्या विरोधात हे मौन होतं,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
“राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. हे संयम आम्हाला आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढे त्यांनी म्हटलं की “जसं टाळ वाजवण्यासाठी लय आणि नियम आहे तसंच राज्य आणि देश चालवण्यासाठीही नियम असतात. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी नियम आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“महापुरुषांविषयी बोलणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आपण बोलायचं असतं. एखादी व्यक्ती चांगल्या भावनेने बोलते, तेव्हा एखादा शब्द वर खाली जाण्याची वाट पाहून बोभाटा करणं हादेखील महापुरुषाचा अवमान करणंच आहे. त्या भावना चुकीच्या पद्धतीने कशा पोहोचतील हे पाहणंही महापुरुषाचा अपमान आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सुनावलं.
“आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेल्या बलिदानांचं मोजमाप करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. आमच्या शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे चित्र पाहून माझं मन खिन्न झालं. महापुरुषांविषयी वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण तेव्हा जिवंत होतो का? तेव्हा तलवारीला धार कशी द्यायची, युद्ध कसं करायचं, तह कसा करायचा, कसे जिंकायचे हे माहिती आहे का? तो संघर्ष कसा होता हे पाहायला आपण तिथे नव्हतो. त्यामुळे त्याचा सन्मान करता येत नसेल, तर थट्टाही करु नये,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“महाराष्ट्राच्या राजकारणात बोलण्याची आणि मौन बाळगण्याची हिंमत दाखवण्याची गरज आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. याच ठिकाणी वडिलांचा अंत्यविधी झाला सांगताना पंकजा मुंडे यांना गहिवरुन आलं. ज्या नेत्याच्या बोलण्यात आणि कर्मात फरक असतो तो लोकांपर्यंत कधी पोहोचू शकत नाही असं त्यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी सांगितलं की “ज्याच्या बोलण्यात आणि कर्मात फरक आहे तो कधीच खरा नेता होऊ शकत नाही. मी कधीच कोणाच्या वाईटाचा विचार केला नाही. शिव्या देणाऱ्यांशीही गोड बोलण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. तुटत नाही तोपर्यंत तुटू द्यायचं नाही हे वडिलांचे संस्कार आहेत. राजकारणातलं हे स्थान खोटं बोलून मिळवता येत नाही”.