गेल्या महिन्याभरात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. शिवसेनेत झालेली मोठी बंडखोरी भाजपाच्या पथ्यावरच पडल्याचं दिसून येत आहे. मात्र, या बंडखोरीमुळे झालेल्या सत्तांतरानंतर देखील अद्याप सत्तेचा खेळ संपला नसून आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. असं असताना दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची चर्चा रंगू लागलं आहे. यावर बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
“निवडणुका तात्काळ स्थगित करा”
आज पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी या दोन प्रमुख मुद्द्यांवर आपलं म्हणणं मांडलं. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बोलताना त्यांनी आरक्षणासोबतच या निवडणुका व्हायला हव्यात, या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. “या निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणुका स्थगित कराव्यात. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासोबतच या निवडणुका व्हायला हव्यात. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जऊ नये”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल…!”
दरम्यान, यानंतर राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार असं वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच पंकजा मुंडेंनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे. “असं झालं तर सर्वात जास्त आनंद मला होईल. उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचं स्वागत आहे. मात्र, पुढच्या गोष्टीवर आत्ताच विधान करणं घाईचं होईल. सध्याच्या वातावरणात कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल, निवडणुकांमध्ये काय होईल? यावर आत्ताच भाष्य करणं चुकीचं ठरेल. दोन्ही पक्षांमध्ये शत्रुत्व राहू नये एवढंच मला वाटतं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“देशाच्या हितासाठी समान विचारांचे पक्ष एकत्र असले, तर त्यातून प्रबळ सरकार बनते आणि जनतेची ताकद वाढते”, असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.