जिल्ह्य़ात भाजपअंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या अविरोध निवडीसाठी बठकांचा सोपस्कार झाल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ‘मर्जी’नुसार जिल्हाध्यक्षांसह तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर होताच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षात उपऱ्यांनाच पदाच्या खैराती वाटल्याचा आरोप करीत गोपीनाथ मुंडे समर्थकांनी थेट स्वतंत्र बठक घेऊन जिल्हाध्यक्ष पदावरून रमेश पोकळे यांना हटवावे आणि तालुकाध्यक्षांची सर्व संमतीने निवड करावी, असा नाराजीचा झेंडा रोवला आहे. सत्तांतरानंतर वर्षभरात नेतृत्वाचा कमी झालेला संपर्क आणि सरकारची धोरणे यामुळे पक्षांतर्गत खदखदत असलेली नाराजी पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मागील १५ दिवसात पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्वत्र बठका झाल्या. सत्ताधारी पक्ष असल्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली. पण माजलगाव तालुकाध्यक्ष वगळता इतर ठिकाणच्या निवडी करण्याचे सर्वाधिकार नेतृत्वाकडे देऊन अविरोध निवडीचा सोपस्कार पूर्ण झाला. पालकमंत्री मुंडे यांच्या सूचनेनुसार शनिवारी जिल्हाध्यक्षपदी पोकळे यांची फेरनिवड आणि तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. अनेक जण इच्छुक असताना काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्यांना पद मिळाल्यामुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी एकदम उफाळून आली.
गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर अनेक वष्रे काम केलेल्या जवळपास पाचशे प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी साई पॅलेस येथे स्वतंत्र बठक झाली. बठकीला विद्यमान आमदार आर. टी. देशमुख हेही अचानक उपस्थित राहिले. या वेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भावना व्यक्त केल्या. माजी आमदार केशव आंधळे, आदिनाथ नवले, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, दशरथ वनवे, राजाभाऊ मुंडे, राजेंद्र बांगर, शिवाजी मुंडे, गोरख रसाळ, विक्रांत हजारी, सुनील मिसाळ, सुधीर शिंदे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बहुतांशी कार्यकर्त्यांनी मागील वर्षभरात जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही आणि नव्याने पक्षात आलेल्या लोकांना पदांची खैरात वाटली जात असल्याचा आरोप केला.