लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या रांगा लागत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये धाराशिवच्या ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या भाषणात अमित देशमुख यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव घेत अमित देशमुख यांनी हा आरोप केला आहे. तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुनही अमित देशमुख यांनी भाजपावर टीका केली आहे.
अमित देशमुख यांचं धाराशिवमध्ये भाषण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो असं म्हटलं होतं. त्याच वाक्याचा संदर्भ घेऊन अमित देशमुख यांनी भाजपावर आरोप केला आहे. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना बरोबर घेत भाजपाची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर बरोबर वर्षभराने अजित पवारही महायुतीत सहभागी झाले. त्यांचाही पक्ष फुटला. असं असलं तरीही लोकसभेच्या जागावाटपावरुन दोन्ही नेते म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीतल्या काही जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. हा सगळा संदर्भ देत अमित देशमुख यांनी भाजपावर टीका केली.
हे पण वाचा- लातूरच्या प्रचारात अमित देशमुखांची ‘ पुरीभाजी’ तर निलंगेकरांचा “निलंगा भात”
काय म्हणाले अमित देशमुख?
महाराष्ट्रात महायुतीत कोण कोणत्या पक्षात आहे? कोण कुणाचा अर्ज भरणार आहे, कोण कुणाचा प्रचार करणार आहे? कुणाच्या तिकिटावर कोण उभं राहणार आहे काहीही कळायला मार्ग नाही. भाजपाने फोडाफोडी केली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपाने फोडाफोडी केली. महाराष्ट्रातली आजची परिस्थिती फारच दयनीय आहे. असं अमित देशमुख म्हणाले.
भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना संपवणं
जी काही फोडाफोडी झाली त्यावरुन आपल्याला वाटत होतं की भाजपाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवायचं आहे. मात्र महायुतीत आत्ता जे काही चाललं आहे त्यावरुन भाजपाचा खरा कट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात असल्याचंच वाटतं आहे असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने ज्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली ते कमी जागा लढवत आहेत आणि जे पक्ष खोटे ठरवले आहेत ते जास्त जागा लढवत आहेत. आमच्या हाती एक सर्व्हे आला आहे. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला ३९ तर महायुतीला अवघ्या ९ जागा मिळतील असं चित्र आहे असंही यावेळी अमित देशमुख म्हणाले.